उल्हासनगर | भाजपा नेते आणि मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दल अपशब्द वापरल्यामुळे याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले होते तसेच राज्यभरात शिवसैनिकांनी भाजपच्या कार्यालयावर हल्लाबोल केला होता. उल्हासनगर भाजप नगरसेवक प्रदीप रामचंदानी यांना काळं फासून मारहाण करण्यात आली होती.
या प्रकरणी त्यांना अटकही करण्यात आली होती. त्यानंतर मनसेचे पदाधिकारी असलेल्या वकिलाने त्यांना जामीन मिळवून दिला. भाजप नगरसेवकाला मारहाण केल्या प्रकरणी उल्हासनगर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात दहापेक्षा जास्त शिवसेना आणि युवासेनेच्या पदाधिकारी,कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले होते. यातील गुन्हे दाखल झालेल्या पैकी पाच जणांना मध्यवर्ती पोलिसांनी अटक केली होती. या सर्व शिवसैनिकांना आज न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला.
त्यात न्यायालयात शिवसैनिकांच्या जामिनासाठी जी वकिलांची टीम होती, त्यात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहर उपाध्यक्ष आणि वकील असलेल्या कल्पेश माने यांचा देखील सहभाग होता.त्यामुळे शिवसैनिकांना जामीन मिळवून देण्यात उल्हासनगर शहरातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली अशी चर्चा यानंतर रंगली. दरम्यान, जामीन मंजूर झाल्यानंतर बाहेर आलेल्या शिवसैनिकांच्या गळ्यात पुष्पहार घालून शिवसैनिकांचे अभिनंदन आणि स्वागत करण्यात आले. तसंच मनसेचे पदाधिकारी वकील आणि इतर वकिलांना शाल देत त्याचे शिवसैनिकांनी आभार मानले.