हनुमंतांकडे मागितली भूमिपूजनाची अनुमती; सरसंघचालक भागवत, अवधेशानंद, बाबा रामदेव यांच्यासह मान्यवर अयोध्येत दाखल

हनुमंतांकडे मागितली भूमिपूजनाची अनुमती; सरसंघचालक भागवत, अवधेशानंद, बाबा रामदेव यांच्यासह मान्यवर अयोध्येत दाखल

अयोध्या : मंगळवारची सकाळ अयोध्येसाठी अतिशय खास होती. सकाळी हनुमानगढी येथे विराजमान बजरंगबलीच्या पूजाअर्चेनंतर श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या भूमिपूजनासाठी हनुमंताची परवानगी मागण्यात आली.

त्याचबरोबर हनुमानगढीवरील शस्त्रास्त्रांचे प्रतीक ‘निशाण’चे अनेक वर्षांनंतर विधिवत पूजन झाले. बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पाच दशकांपासून प्रतीक्षित श्रीराम मंदिर बांधकामासाठी भूमिपूजन होईल.

जन्मभूमीवर चारही भावांसह विराजमान श्रीरामलल्लांचे मंगळवारी ‘रामार्चा’ पूजन झाले. ते चार तास चालले. यात श्रीरामलल्लांसह देवतांच्या प्रत्येक मंत्राबरोबर तुळशीपत्र समर्पित केले जाते. रुद्राभिषेकासारखीच ही पूजा असते.

पूजनासाठी ११ आचार्यांसह काशीतील विद्वत परिषदेचे तीन आचार्य प्रो. राजनारायण द्विवेदी, प्रो. रामचंद्र पांडेय, प्रो. विनयकुमार तिवारी यांची उपस्थिती होती. भूमिपूजन होत असलेल्या ठिकाणी स्वतंत्र आचार्य होते. तेथे त्यांनी वास्तुशांती पूजन, नवग्रह इत्यादी पूजन विधी पार पाडले. देश-विदेशातील ९ शिलापूजनाचाही त्यात समावेश आहे.

पूजा झालेल्या शिळांसह कांची मठाचे शंकराचार्य यांच्याकडून आलेली कांस्यशिला, नवरत्न व सामग्रीसह बुधवारी पंतप्रधान स्वतिवाचन, वैदिक मंत्रांसह मंदिर निर्माण आरंभ पूजा करतील. काशी विद्वत आचार्यांसह आलेले चांदीचे नाग दांपत्य, कच्छप व रत्नही विराजमान होतील. देशभरातून १५०० ठिकाणांहून आलेले जल व पवित्र मातीचेही पूजन होईल. मंगळवारी परिसर ऋग्वेद, अथर्ववेद, सामवेद, यजुर्वेदाच्या वैदिक मंत्रांनी मुग्ध झाला होता. परिसरात यज्ञ-आहुतीचा दरवळ पसरलेला आहे. गेल्या ३५ वर्षांच्या आंदोलनातील समर्थकांचे दुपारनंतर पाहुण्याच्या रूपाने आगमन होत होते. सायंकाळपर्यंत बहुतांश पाहुणे मंडळी दाखल झाल्याचे ट्रस्टच्या सूत्रांनी सांगितले.

सरसंघचालक मोहन भागवत, मगहर कबीर मठाचे पीठाचार्य जितेंद्रानंद सरस्वती, बाबा रामदेव, स्वामी अवधेशानंद, चिदानंद मुनी, सुधीर दहिया, राजू स्वामी, ब्रह्मानंद स्वामी, सुरेश पटेल, रितेश डांडिया यांच्यासह देशभरातील १३५ संत-महंत भूमिपूजन कार्यक्रमाचे साक्षीदार होण्यासाठी अयोध्येत पोहोचले आहेत.

स्मृतिचिन्ह पाहुण्यांना राम दरबाराच्या चित्राचे चांदीचे नाणे भेट

श्रीराम जन्मभूमी ट्रस्ट कार्यक्रमात उपस्थित सर्व पाहुण्यांना चांदीचे नाणे भेट दिले जाईल. त्याच्या एका बाजूस राम दरबार तथा दुसऱ्या बाजूस भगवान राम, सीता, लक्ष्मण व हनुमान असतील. दुसऱ्या बाजूस ट्रस्टचे प्रतीकचिन्ह असेल. अयोध्येतील भाविकांत रघुपती लड्डू म्हटले जाणारे १.२५ लाख लाडू वाटप केले जातील. अयोध्येपासून ६५० किमीवरील गौतम बुद्ध नगरात रावणाचे मंदिर आहे. या मंदिराचे पुजारी महंत रामदास म्हणाले, मला राम मंदिराच्या भूमिपूजनाची प्रतीक्षा आहे. आम्ही मिठाई वाटू.

🛕हनुमानगढी येथे येणारे देशाचे पहिले पंतप्रधान ठरतील मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदा हनुमान मंदिरात जातील. येथे ते दहा मिनिटापर्यंत पूजन करतील. हनुमानगढीकडून त्यांना पगडी, मुकुट व गदा भेट दिली जाईल. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच हनुमानगढीचे पूजन करणारे ते पहिलेच पंतप्रधान ठरतील. पंतप्रधान पवित्र शरयू नदीचे दर्शन करतील. रामलल्लाचे पुजारी सत्येंद्र दास म्हणाले, पंतप्रधान पूजा करताना त्यांच्याजवळ कोणीही नसेल. तेथे आरतीची थाळी सजवलेली असेल.

📌काँग्रेस म्हणाली- एकतेचा संदेश, सेना म्हणाली- हा सुवर्णक्षण

काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी-वढेरा ट्विट करून म्हणाल्या, सहजता, साहस, संयम, त्याग दीनबंधू राम नामाचे सार आहे. राम सर्वांत आहेत. राम सर्वांसोबत आहेत. रामलल्लाच्या मंदिर भूमिपूजनाचा कार्यक्रम राष्ट्रीय एकता, बंधुता, सांस्कृतिक एकतेची संधी ठरावी. गांधींचे रघुपती राघव राजाराम सर्वांना सन्मती देणारे आहेत. वारिस अली शाह म्हणाले, जो रब आहे तोच राम आहे. शिवसेनेचे मुखपत्र सामनात हा सुवर्णक्षण आहे. भगवान रामाच्या आशीर्वादाने कोरोना संपून जाईल, असे म्हटले.

ग्लोबल न्युज नेटवर्क: