महाराष्ट्रा पाठोपाठ आता युपीत ही भाजपला धक्का; पंतप्रधान मोदींच्या मतदारसंघात विधानपरिषदेच्या दोन जागांवर पराभव

वाराणसी : पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीत  भारतीय जनता पक्षाला पराभवाचा झटका बसला आहे. विधानपरिषद निवडणुकीत  भाजपला दोन जागा गमवाव्या लागल्या आहेत. या दोन जागांपैकी एक जागा शिक्षक मतदारसंघ तर दुसरी जागा पदवीधर मतदारसंघाची होती. या दोन्ही जागांवर समाजवादी पक्षाच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे. समाजवादी पक्षाचे उमेदवार आशुतोष सिन्हा यांनी वाराणसी पदवीधर मतदारसंघातून विजय मिळवला आहे तर त्यांच्याच पक्षाचे लाल बिहारी यादव यांनी वाराणसी शिक्षक मतदारसंघातून विजय मिळवला आहे.

समाजवादी पक्षाच्या आशुतोष सिन्हा यांना २६,३३५ मते मिळाली तर भाजपच्या केदारनाथ सिंह यांना २२,६८५ मते मिळाली. यामुळे ही निवडणूक समाजवादी पक्षाचे उमेदवार आशुतोष सिन्हा यांनी ३६५० मतांनी जिंकली आहे.

वाराणसी शिक्षक मतदारसंघातून विजय मिळवलेले समाजवादी पक्षाचे लाल बिहारी यादव म्हणाले, “पक्षासाठी हा एक मोठा विजय आहे. या निकालामुळे मी खूपच आनंदी आहे.” भारतीय जनता पक्षाचा गड असलेल्या वाराणसीत समाजवादी पक्षाने विजय मिळवत सर्वांनाच आश्चर्यचकित केलं आहे.

कोणत्या उमेदवाराला किती मते

आशुतोष सिन्हा (समाजवादी पार्टी – २६३३५

केदारनाथ सिंह (भाजप) – २२६८५

अरड्वद सिंह पटेल – ७७४०

करुणाकांत मौर्य – ६६४२

डॉ. गोपाल सिंह – १६१४

गणेश गिरी – ९६६

अनिल कुमार मिश्र – ६३३

डॉ. लोकेश कुमार शुक्ल (भारतीय जन जन पार्टी) – १४०

भारतातील एकूण सहा राज्यांत द्विसदनीय विधानसभा म्हणेजच विधानसभा आणि विधानपरिषद असे दोन सभागृह आहेत. या सहा राज्यांत उत्तरप्रदेशचाही समावेश आहे. उत्तरप्रदेशच्या विधान परिषदेत एकूण १०० सदस्य आहेत. उत्तरप्रदेशातील विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी १ डिसेंबर रोजी मतदान झाले होते. या ११ जागांपैकी ५ पदवीधर मतदारसंघ तर ६ शिक्षक मतदारसंघांचा समावेश होता.

ग्लोबल न्युज नेटवर्क: