मुंबई : भांडुप येथे मॉलमध्ये असलेल्या कोविड रुग्णालयाला लागलेली आग ताजी असताना आता प्रभादेवी परिसरात आणखी एक आग लागल्याची बातमी समोर येत आहे. प्रभादेवीमध्ये असणाऱ्या “गॅमा हाऊस” इमारतीला ही आग लागली आहे.
गॅमा हाऊस इमारतीच्या बेसमेंट आणि तळमजल्याला ही आग लागली आहे. प्रभादेवीतून जाणाऱ्या वीर सावरकर मार्गावर ही चार मजली इमारत आहे. आग लागल्यानंतर एकच खळबळ याठिकाणी उडाली होती. सध्या परिसरातील वाहतूक बंद करण्यात आली आहे.
सध्या अग्निशामक दलाला आगीवर नियंत्रण आणण्यात यश आलेले आहे. तसेच घनस्थळी फायब्रिगेडच्या ४ गाड्या तसेच पाण्याचे चार जम्बो टँकर घटनास्थळी दाखल झाले आहेत. व्यावसायिक वापरासाठी या इमारतीचा वापर होत होता.
दरम्यान इमारतीमध्ये मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक केबल आणि इतर ज्वलनशील गोष्टी असल्याने आगीचा धोका वाढू शकतो. याठिकाणी आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. आतापर्यंत हाती आलेल्या बातमीनुसार या आगीत कोणतीही जीवितहानी किंवा कुणीही जखमी झालेले नाही.