शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री रामदास कदम हे आजच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला उपस्थित राहणार की नाहीत याबाबत विविध चर्चा रंगत होत्या. त्यात दरम्यान आता रामदास कदम यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिल्याची माहिती समोर आली आहे. उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून आपण आज दसरा मेळाव्यास तब्येतीच्या कारणास्तव येत नसल्याचं रामदास कदम यांनी कळवलं आहे.
मागच्या तीन महिन्यापासून रामदास कदम आजारी आहेत. त्यांना डाँक्टरांनी गर्दीत न जाण्याचं आणि विश्रांतीचा सल्ला दिला आहे. त्यामुळे कदम आज संध्याकाळी षण्मुखानंद सभागृहात होणाऱ्या शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यास उपस्थित रहाणार नाहीत. काही दिवसांपूर्वी रामदास कदम यांच्या आवाजाची एक कथित आँडिओ क्लिप व्हायरल झाली होती. ज्यात ते भाजप नेते किरीट सोमय्या यांना परीवहन मंत्री अनिल परब यांच्या विरोधातील पुरावे देण्यासंदर्भात खेड मधील स्थानिक कार्यकर्त्यांशी फोन वरून संवाद साधत आहेत.
त्या पार्श्वभूमीवर आज होणाऱ्या दसरा मेळाव्यास शिवसेना नेते रामदास कदम उपस्थित रहाणार की नाही यावर मोठी चर्चा राजकिय वर्तुळात सुरू होती. पण आता ते मेळाव्याला उपस्थित राहणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. दरम्यान रामदास कदम यांना शिवसेनेने मेळाव्यास प्रवेश दिला नाही की रामदास कदम यांनी मेळाव्याकडे पाठ फिरवली यावरुन आता विविध चर्चा सुरू झाल्या आहेत.