आगामी 24 तासातही मुंबईसह पश्चिम किनारपट्टीच्या भागात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी सर्वोतोपरी मदतीचे आश्वासन दिले.

मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर, सावधगिरी बाळगा, आवश्यक असेल तरच बाहेर पडा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईकरांना केले आहे. आजदेखील पावसाचा जोर कायम राहील, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

त्या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्तांनी पोलीस, रेल्वे, आरोग्य यंत्रणा तसेच ‘एनडीआरएफ’ यांच्या समन्वयाने परिस्थिती हाताळावी. त्याचप्रमाणे रहिवाशांची जिथे गैरसोय होत आहे किंवा खंडित वीजपुरवठा, झाडे पडणे, साचलेले पाणी याविषयी तातडीने कार्यवाही करावी. तसेच ‘एमएमआरडीए’च्या अधिकार्यांनीही ठिकठिकाणी सुरू असलेलेल्या मेट्रो कामांच्या ठिकाणी अधिक सजग राहावे असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.
मुंबईसह महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करून आढावा घेतला. यावेळी केंद्राकडून सर्वतोपरी मदत करू असे आश्वासन दिले.