राज्यात तसेच देशात एवं मशीनचा मुद्धा तापत असताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा एकदा EVM वरून भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला आहे, सत्तेचे जॅकेट घालणाऱ्यांना ते घालू द्या, त्या जॅकेटचा परिणाम आगामी कर्नाटक आणि महाराष्ट्रातील निवडणुकांवर होणार नाही. त्यात निवडणुकीचे मतदान हे बॅलेटने किंवा ईव्हीएम मशीनवर जरी झाले तरी भारतीय जनता पक्ष हरणार आहे, असे मत काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मांडले.
ठाण्याच्या गडकरी रंगायतन येथे सोमवारी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या विस्तारित कार्यकारिणीची बैठक झाली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत नाना पटोले बोलत होते.विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, एआयसीसीचे सचिव सहप्रभारी आशिष दुआ, संपतकुमार, खा. कुमार केतकर, माजी मंत्री विश्वजित कदम, माजी खा. हुसेन दलवाई आदी नेते मंडळी उपस्थित होते.
राहुल गांधी यांनी अदानी महाघोटाळ्यावर संसदेत मोदी सरकारला धारेवर धरले. मोदी-अदानी यांचा संबंध काय, हे प्रश्न विचारल्यानेच त्यांच्यावर सूडबुद्धीने कारवाई केली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी या कारवाईंचा निषेध करत असून, राहुल यांच्या पाठीशी सर्वजण खंबीरपणे उभे आहेत. राहुल गांधींवरील कारवाईविरोधात जय भारत सत्याग्रहाची धार कायम ठेवत तालुका, गावपातळीवर हा सत्याग्रह पोहोचला पाहिजे असे सुद्धा यावेळी नाना पटोले यांनी बोलून दाखविले होते.
पुढे बोलताना पटोले म्हणाले की, आज राज्यात ३२ लाख मुले स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करत असताना शिंदे सरकार मात्र आऊटसोर्सिंग करत आहे. काँग्रेस सरकार आल्यानंतर या भरती केल्या जातील असे अश्वासन त्यांनी दिले तसेच येणाऱ्या भविष्यात ठाणे जिल्ह्यात काँग्रेस पक्षाचे आमदार आणि खासदार दिसतील. ठाणे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण यांना धमकीचे फोन आले. तर, कार्यकर्ते गिरीश कोळी यांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. त्याची साधी पोलिसांनी तक्रारही घेतली नाही, अशी खंत नाना पटोले यांनी व्यक्त केली