आमदार आणि माजी मंत्री बच्चू कडू यांना दुचाकीने धडक दिल्याची घटना अमरावतीत घडली आहे. बच्चू कडू यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. त्यांच्या डोक्याला मार लागला असून चार टाके पडले आहे. पण, त्यांची प्रकृती आता धोक्याबाहेर आहे. संध्याकाळी त्यांना डिस्चार्ज दिला जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी 6 ते साडेसहाच्या दरम्यान ही घटना घडली. आमदार बच्चू कडू हे रस्ता ओलांडत होते. त्याच वेळी एक भरधाव दुचाकी आली आणि तिने कडूंना धडक दिली.
याा धडकेत बच्चू कडू रोडच्या डिव्हायडरवर आदळल्याने डोक्याला मोठ्या प्रमाणात मार लागला. तसंच पायाला गंभीर दुखापत झालेली आहे. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बच्चू कडू यांच्या डोक्याला चार टाके पडले असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्यावर अमरावतीच्या एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. त्यांची प्रकृती आता स्थिर आहे.
दरम्यान, मागील काही दिवसांपासून राजकीय नेत्यांच्या वाहनांना अपघात झाल्याचे समोर आले आहे. बीडमध्ये राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांच्या गाडीला अपघात झाला. या अपघातात मुंडे यांच्या छातीला मार लागला आहे. त्यांच्यावर सध्या मुंबईतील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. तर, 6 जानेवारी रोजी आमदार योगेश कदम यांच्या गाडीला रात्री सव्वादहाच्या सुमारास रायगड जिल्ह्यातल्या पोलादपूर नजीक कशेडी घाटात चोळई येथे अपघात झाला आहे. यात आमदार योगेश कदम सुखरूप आहेत. त्यांच चालक आणि पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.