भारतीय जनता पक्षाचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बाबरी मशीद पाडण्यात एकाही शिवसैनिकाचा सहभाग नव्हता, असा खळबळजनक दावा केला आहे. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भाजपसह शिंदे गटावर निशाणा साधला. यावर आता बाबरी पाडली तेव्हा उद्धव ठाकरे कुठे होते?, असा उलट सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.
बाबरी प्रकरणावरुन एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंनाच लक्ष्य केले आहे. एकनाथ शिंदे म्हणाले की, “बाबरी पाडली तेव्हा आताचे माजी मुख्यमंत्री कुठे होते? त्यांना बाबरी मशिदीच्या मुद्द्यावर बोलण्याचा कोणताही अधिकार नाही. बाबरी आंदोलनात कोणताही पक्ष नव्हता. सर्वच जण रामभक्त म्हणून सहभागी झाले होते. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी घेतलेली भूमिका जगजाहीर आहे.”
पुढे एकनाथ शिंदे म्हणाले की, “बाबरी पाडल्यानंतर मुंबईत दंगल उसळली तेव्हा मुंबईचे रक्षण हे बाळासाहेबांनीच केले होते. बाबरी पाडल्यानंतर बाळासाहेबांनीच परखड भूमिका घेत याचे समर्थन केले होते. तेव्हा राम मंदिराला ज्यांनी विरोध केला त्यांच्यासोबत जे आता सत्तेत सहभागी झाले आहेत, त्यांना आता बाबरीवर बोलण्याचा काय अधिकार आहे? अयोध्येत राम मंदिर बनावे हे बाळासाहेबांचे स्वप्न होते, हे स्वप्न नरेंद्र मोदींनी पूर्ण केले.” असे सुद्धा शिंदे यांनी यावेळी बोलून दाखविले होते,