उत्तर प्रदेश मध्ये महिला पोलीस नाहीत ? संजय राऊतांचा योगी सरकारवर पुन्हा निशाणा

मुंबई : उत्तर प्रदेशातील हाथरस घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. उत्तर प्रदेश सरकार दडपशाही करत असल्याचे आरोप विरोधकांसह सामान्यांकडून केले जात आहे. तर स्थानिक प्रशासनाच्या भूमिकेवर देखील प्रश्न उपस्थित केले जात आहेत. हे प्रकरण विरोधकांनी देखील उचलून धरले असून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी योगी सरकारवर पुन्हा निशाणा साधला आहे.

पीडित कुटुंबाची भेट घेण्यासाठी माध्यम प्रतिनिधींना देखील रोखले जात असून संजय राऊतांनी यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. “माध्यमांना का अडवले जात आहे. जर सरकारने काही चुकीचे केलेले नाही, तर या प्रकरणातील सत्य बाहेर आणण्यासाठी माध्यमांना तिथे जाऊ दिले पाहिजे”, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. तर याआधी देखील संजय राऊतांनी या घटनेवरुन योगी सरकारवर निशाणा साधलेला.

हाथरसमधील सामुहिक बलात्काराच्या भयानक घटनेचे पडसाद देशभरात उमटत आहेत. महाराष्ट्रात देखील या घटनेवर संताप व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, संबंधित पीडितेच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी गेले असता त्यांची अडवणूक करत पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. यावेळी राहुल गांधी यांना धक्काबुक्की करण्यात आल्याने वातावरण आणखी तापले. याचा देखील संजय राऊत यांनी निषेध केला. राहुल गांधींची काँलर पकडली, धक्काबुक्की केली,जमिनीवर पाडले हे चित्र कोणत्याही सुसंस्कृत समाजाला आणि राजकारणाला शोभणारे नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले होते.

ग्लोबल न्युज नेटवर्क: