आनंदवार्ता : यंदा सरासरीच्या 103 टक्के पावसाचा अंदाज; वाचा सविस्तर-

येणारा पावसाळा सलग तिसऱ्या वर्षी देशभरात समाधानकारक असेल, असा अंदाज स्कायमेट वेदर या हवामान अंदाज वर्तवणाऱ्या खासगी संस्थेच्या माध्यमातून वर्तवण्यात आला आहे. मंगळवारी स्कायमेटने मान्सूनच्या दीर्घकालीन अनुमानाविषयी ऑनलाइन पत्रकार परिषदेमध्ये याविषयी माहिती दिली. सन २०२१ मध्ये सरासरीच्या १०३ टक्के (+/- ५ टक्के) पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यामध्ये सरासरीइतका पाऊस पडेल, असाही अंदाज आहे.

यावर्षी पावसाळ्याचा सुरुवातीचा महिना जून आणि शेवटचा महिना सप्टेंबरमध्ये देशभरात व्यापक पावसाची चिन्हे आहेत. 96 टक्के ते 104 टक्के दरम्यानचा पाऊस सरासरी किंवा सामान्य पावसाळा म्हणून परिभाषित केला जातो. नैऋत्य मान्सून साधारणत: 1 जूनच्या आसपास केरळमार्गे भारतात प्रवेश करतो. पावसाळ्याच्या 4 महिन्यांनंतर म्हणजे सप्टेंबरअखेर मान्सून राजस्थानमार्गे परत येतो.

हवामानाची माहिती देणारी स्कायमेट ही एक खासगी भारतीय संस्था पावसाळ्याच्या दोन महिन्यांआधीच म्हणजेच एप्रिलमध्ये दरवर्षी मान्सून (जून ते सप्टेंबर) कसा असेल, याचा अंदाज वर्तवते. स्कायमेटचे जीपी शर्मा सांगतात की, अंदाज बांधण्यासाठी त्यांची हवामानशास्त्रज्ञांची टीम देशातील प्रत्येक 9 किलोमीटरनंतर तपासणी करते. तेथील हवेचा प्रवाह, तापमान, दबावाची स्थिती मोजतो आणि त्यावर आधारित त्याचा अहवाल तयार केला जातो.

त्याचप्रमाणे एप्रिल-मेमध्येच भारत सरकारचा हवामान विभाग (आयएमडी) देखील आपला अंदाज वर्तवतो. या दोघांच्या अलवालाच्या आधारावर शेती, पूर आणि आपत्तींची तयारी सुरू केली जाते. अशा परिस्थितीत या दोन संस्थांच्या आकडेवारीत किती अचूकता आहे हे जाणून घेणे आवश्यक आहे. म्हणूनच, बातमीच्या इमेजमध्ये आम्ही गेल्या 10 वर्षात स्कायमेट, हवामान विभागाचा अंदाज आणि पावसाचा वास्तविक डेटा आकड्यांत दिला आहे.

गेल्या 10 वर्षातील सर्वात वाईट अंदाज 2015 मध्ये वर्तवला गेला होता
आकडेवारीनुसार 2015 स्कायमेटने एलपीएच्या तुलनेत 102% तर हवामान विभागाने 93% पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली होती, तर प्रत्यक्ष पाऊस एलपीएच्या तुलनेत केवळ 86% पडला होता. गेल्या 10 वर्षातील हा सर्वात वाईट अंदाज होता. त्यानंतर 16% कमी पाऊस पडला. जीपी शर्मा सांगतात की, केवळ केरळ आणि कर्नाटकमध्ये कमीतकमी 16% पाऊस कमी किंवा जास्त झाल्याने फारसा परिणाम होत नाही, परंतु राजस्थान आणि गुजरातमधील शेतक-यांसाठी ही मोठी गोष्ट आहे. म्हणूनच पावसाळ्याबाबत अचूक अंदाज वर्तवणे फार महत्वाचे आहे.

ते म्हणतात, “चुका होण्याची शक्यता नेहमीच असते, कारण भारत केवळ संस्कृतीतच नाही तर वातावरणाच्या बाबतीतही खूप वैविध्यपूर्ण आहे. येथे वन, पर्वत आणि सपाट या तिघांचे समृद्ध मिश्रण आहे. त्यामुळे अगदी योग्य अंदाज लावणे फार कठीण आहे. ‘

पूर्वी प्रत्येक 27 किमी. नंतर तपासणी करीत असे स्कायमेट, आता लक्ष्य प्रत्येक 3 किमीचे भारतीय वायुसेनेत एअरमार्शल राहिलेले जीपी शर्मा म्हणतात की, पूर्वी स्कायमेट दर 27 किलोमीटर नंतरचा अंदाज वर्तवत असे, परंतु आता तांत्रिक विकासामुळे 9 किलोमीटपर्यंतचा अंदाज वर्तवणे शक्य झाले आहे. मात्र हा शेवटचा टप्पा नाही. आता संस्थेचे ध्येय प्रत्येक तीन किमीच्या तपासणीपर्यंत पोहोचणे आहे आणि त्यानंतर अधिक अचूक माहिती दिली जाऊ शकेल.

भारतातील पावसाचे एक प्रमुख कारण म्हणजे पाश्चात्य देशांमधील वारे. स्कायमेटच्या महेश पलावत यांच्या मते, आपल्या देशात पश्चिमेकडून पूर्वेकडे सतत वारे वाहत असतात. हे वारे युरोपियन देशांपासून सुरू होतात. इराक, इराण आणि पाकिस्तानमध्ये अशी डोंगरवाट नाही, ज्यामुळे त्यांची वाट अडेल. त्यामुळे जम्मूच्या पर्वतांना धडक दिल्यानंतर उत्तर भारतात बर्‍यापैकी पाऊस पडतो. यामुळे ऑक्टोबर ते मार्च या दरम्यान पंजाब, हरियाणा आणि अगदी पश्चिम उत्तर प्रदेशात पाऊस पडतो, म्हणजेच हिवाळ्यातील पाऊस या कारणामुळे पडतो.

जी.पी. शर्मा म्हणाले की, भारतात जून ते सप्टेंबर हा काळ पावसाळ्याचा असतो. याकाळात बंगालच्या उपसागर आणि अरबी समुद्रात निर्माण झालेल्या वाफांमुळे पाऊस पडतो.

यंदाच्या पावसाळ्यासाठीचे अंदाज

– अतिरिक्त पावसाची १० टक्के शक्यता (ऋतूमध्ये ११० टक्क्यांहून अधिक पाऊस)

– सरासरीहून अधिक पावसाची १५ टक्के शक्यता (ऋतूमध्ये १०५ ते ११० टक्के पाऊस)

– सरासरीइतक्या पावसाची ६० टक्के शक्यता (ऋतूमध्ये ९६ ते १०४ टक्के पाऊस)

– सरासरीहून कमी पावसाची १५ टक्के शक्यता (ऋतूमध्ये ९० ते ९५ टक्के पाऊस)

– दुष्काळाची शून्य टक्के शक्यता (ऋतूमध्ये ९० टक्क्यांहून कमी पाऊस)

महिनानिहाय पाऊसाचा अंदाज

– जून :सरासरीच्या १०६ टक्के

– जुलै : सरासरीच्या ९७ टक्के

– ऑगस्ट : सरासरीच्या ९९ टक्के

– सप्टेंबर : सरासरीच्या ११६ टक्के

ग्लोबल न्युज नेटवर्क: