आनंद वार्ता : आता लहान मुलांसाठी कोरोना प्रतिबंधक लस ,फायझर कंपनीने केला दावा

 

नवी दिल्ली : फायझर कंपनीने दावा केला आहे की, फायझर-बायोएनटेक कोविड १९ लस ही १२ ते १५ वर्षाच्या मुलांसाठी आहे. ही लस १०० टक्के प्रभावी असल्याचा दावाही कंपनीने केला आहे. अमेरिकेत १६ वर्षे आणि त्याहून अधिक वय असलेल्या तरुणांना फायझरची लस देण्यात येत आहे. तर एका अभ्यासानुसार, अमेरिकन फार्मा कंपनी फायझर आणि जर्मन कंपनी बायोएनटेक यांनी संयुक्तपणे ही कोरोना प्रतिबंधक लस तयार केली आहे.

ब्रिटन आणि त्यानंतर दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेल्या कोरोना स्ट्रेनवर ही लस प्रभावी असल्याचं बोललं जात आहे. भारतात सध्या ४५ वर्षांहून अधिक वय आणि फ्रंटलाईन वर्कर्ससाठी लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. लहान मुलांना अद्याप कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येत नाहीये.

 

सध्यस्थितीत केवळ फायझर-बायोएनटेक लसीचा उपयोग अमेरिकेत १६ आणि १७ वर्षांच्या मुलांना दिली जात आहे. मॉडर्नाची लस १८ वर्षे आणि त्याहून अधिक वय असलेल्या व्यक्तींना दिली जात आहे.

फायझरने सांगितले की, १२ ते १५ वर्षे वयोगटातील २२६० अमेरिकन नागरिकांवर केलेल्या चाचण्यांनंतर समोर आलेल्या प्राथमिक आकडेवारीनुसार या लसीचे संपूर्ण डोस घेतल्यानंतर त्यापैकी कुठल्याही मुलाला कोरोनाचा संसर्ग झाल्याचं समोर आलेलं नाहीये. संशोधकांनी सांगितले की, या लसीचे डोस घेतल्यानंतर मुलांमध्ये जास्त प्रमाणात अँटीबॉडीज तयार झाले.

भारतात १ एप्रिलपासून ४५ वर्षांहून अधिक वयाच्या व्यक्तींना लस

भारतात १६ जानेवारी २०२१ पासून कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन अशा दोन कोरोना प्रतिबंधक लसींचे डोस देण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, पहिल्या टप्प्यात फ्रंटलाईन वर्कर्स, आरोग्य सेवकांना ही लस देण्यात येत होती. आता भारतामध्ये १ एप्रिल २०२१ पासून ४५ वर्षांहून अधिक वय असलेल्या सर्व नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येणार आहे. ही लस सरकारी लसीकरण केंद्रावर मोफत दिली जाणार आहे तर खासगी लसीकरण केंद्रांवर २० रुपयांत दिली जाणार आहे.

 

 

ग्लोबल न्युज नेटवर्क: