स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायलयाने दिले आहेत. त्यात मध्य प्रदेश सरकारने ओबीसी आरक्षणाला मंजूरी दिल्यानंतर महाराष्ट्रात ओबीसी आरक्षणाचा मुद्दा गाजत आहे. याच मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी याच मुद्द्यावरून राज्य सरकारवर निशाणा साधला. यासंदर्भात विचारणा केली असता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी पंकजा मुंडे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर दिली आहे. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करावा, त्यांच्यासाठी आमची दारे नेहमी खुली आहेत.
ज्या पक्षात त्यांना सन्मानाने वागणूक दिली जात नाही. ज्यांच्या वडिलांनी हा पक्ष वाढवला त्या पंकजाताईंना जनआक्रोश मोर्चामध्ये साधे सन्मानाचे स्थान मिळाले नाही. मी तर पंकजाताईंना विनंती करतो, की जिथं आपला अपमान होत असेल, अशा लोकांना लाथ मारावी. तुमच्यासारख्या बहिणींची आम्हालाही आवश्यकता आहे, असे अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे.