एअर इंडिया पुन्हा मूळ मालकाकडे परतणार, टाटाने लावली बोली !

 

नवी दिल्ली | सध्या केंद्र सरकारने अनेक सरकारकी कंपन्या खाजगी तत्वावर चालवण्यासाठी तसेच विक्रीसाठी काढल्या असून संपूर्ण जगभरात प्रवाशांना ने-आण करणाऱ्या तसेच सरकारी मालकीच्या एअर इंडियाच्या खरेदीसाठी बुधवारी टाटा समूहाने बोली लावली. बोलीचा आज शेवटचा दिवस होता. गुंतवणूक व सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापनाच्या सचिवांनी सांगितले की, एअर इंडियाच्या खरेदीसाठी बोली आली असून, आता आर्थिक व्यवहार शेवटच्या टप्प्यात आहे.

एअर इंडियाला खरेदी करण्यासाठी इतर कोणत्या कंपनीने बोली लावली, याची माहिती देण्यात आली नाही. मात्र टाटा समूहाबरोबर स्पाइसजेटनेही एअर इंडियाच्या खरेदीमध्ये रस दाखविला होता. बोली लावण्याचा १५ सप्टेंबर अखेरचा दिवस होता, असे विमान वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य सिंदिया यांनी आधीच स्पष्ट केले होते.

एअर इंडियातील १०० टक्के हिस्सेदारी विकण्याचा निर्णय केंद्र सरकारने आधीच घेतला होता. त्याआधी मर्यादित हिस्सा विकण्याचा विचार सरकारने बोलून दाखवला. पण त्यात कोणीही रस दाखवला नव्हता. एअर इंडियावर आजच्या घडीला ४२ हजार कोटी रुपयांचे कर्ज असून, त्यापैकी २२ हजार कोटी रुपयांचे कर्ज एअर इंडिया ॲसेट होल्डिंग कंपनीकडे वळवले जाणार आहे. या कर्जपायी हा निर्णय घेण्यात आलेला आहे.

Team Global News Marathi: