नवी दिल्ली | देशभरातील अग्निपथवरुन सुरू असलेला गोंधळ थांबण्याचं नाव घेत नसून सोमवारी विद्यार्थ्यांच्या भारत बंदनंतर आता 24 जून रोजी संयुक्त किसान मोर्चाने देशव्यापी बंद पुकारला आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तिन्ही लष्करप्रमुखांची स्वतंत्रपणे भेट घेणार आहेत.
शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी हरियाणातील कर्नाल इथे सांगितलं की, त्यांची संघटना अग्निपथ योजनेला विरोध करेल. टिकैत म्हणाले की, एसकेएम अग्निपथ योजनेच्या विरोधात 24 जून रोजी देशभरातील जिल्हा मुख्यालयात आंदोलन करेल. याआधी सोमवारी विद्यार्थ्यांनी देशव्यापी बंद पुकारला होता, त्याला विरोधकांनी पाठिंबा दिला होता.
या आंदोलनाचा सर्वात मोठा परिणाम दिल्ली-एनसीआरमध्ये दिसून आला. दिल्ली, नोएडा, गुडगावसह एनसीआरमधील अनेक रस्ते तासंतास ठप्प होते. तसेच दिल्लीच्या सीपीमध्ये रस्ते रोखण्यात आले होते. सीपीला लागून असलेल्या जनपथ आणि बाबा खरकसिंग मार्गावर प्रचंड जाम होता तसेच याचा सामना सामान्य नागरिकांना करावा लागत होता.
टिळक पुलावर रेल्वेसमोर गोंधळ घालणाऱ्या १६ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्याचवेळी काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे, सलमान खुर्शीद, रणदीप सुरजेवाला, शक्ती सिंह, इम्रान प्रतापगढ़ी यांनी जंतरमंतरवर निदर्शने केली. भारतीय युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दिल्लीच्या शिवाजी ब्रिज रेल्वे स्थानकावर ट्रेन थांबवली. मात्र पोलिसांनी वेळीच संवाद भूमिका घेत काँग्रेस कार्यकर्त्यांना तिथून हटवून गाडी रवाना केली.