योगींच्या गडात आदित्य ठाकरें शिरणार, करत शिवसेना उमेदवारांचा प्रचार

 

उत्तरप्रदेश | उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेथील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून सत्ताधारी भाजपचे योगी आदित्यनाथ सरकार आणि विरोधकांमध्ये तुंबळ आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहेत. यातच शिवसेनाही आता प्रचारात उतरणार आहे. महाराष्ट्राचे पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे उत्तर प्रदेश दौऱ्यावर असून, काही ठिकाणच्या शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी मैदानात उतरणार आहेत.

आदित्य ठाकरे यांच्यासोबत शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत आणि प्रियंका चतुर्वेदी प्रचारात सहभागी होणार असल्याचे सांगितले जात आहे. यासंदर्भात संजय राऊत यांनी ट्विटरवरून माहिती दिली आहे. उत्तर प्रदेशमधील डुमरियागंज विधानसभा मतदारसंघातील सिद्धार्थनगर, प्रयागराज जिल्ह्यातील कोरांव येथे शिवसेना उमेदवारांच्या प्रचारसभांमध्ये आदित्य ठाकरे सामील होणार असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

भाजपवर सातत्याने टीका करताना येणाऱ्या निवडणुकीमध्ये टक्कर देण्यासाठी शिवसेनेने आपले उमेदवार निवडणूक रिंगणार उतरवले आहेत. भाजपला देशात आव्हान उभे करण्यासाठी शिवसेनेने कंबर कसल्याचे पाहायला मिळत आहे. एकूण ४०३ जागांसाठीच्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे ३९ उमेदवार रिंगणात असल्याची माहिती मिळाली आहे.

Team Global News Marathi: