पुणे: पवार कुटुंबातील तिसऱ्या पिढीतील पार्थ पवार यांनी मावळ लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवत राजकारणात प्रवेश केला आहे. आता शरद पवार यांचे दुसरे नातू असणारे रोहित पवार यांनी देखील विधानसभेच्या आखाड्यात उतरणार असल्याचे स्पष्ट केले आहे. पुण्यामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
रोहित पवार हे सध्या पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत, मागील अनेक दिवसांपासून त्यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघात संपर्क वाढवलेला आहे. त्यामुळे रोहित हे कर्जतमधून विधानसभा लढवणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. मात्र आजवर त्यांनी जाहीरपणे बोलणे टाळले होते. आज पत्रकार परिषदेत बोलताना आपण विधानसभा लढणार असून कोणत्या मतदारसंघातून लढायचं हे वरिष्ठ नेते ठरवतील. असे उत्तर रोहित पवार यांनी दिले आहे.
यावेळी बोलताना रोहित यांनी राज्य सरकारच्या ढिसाळ कारभारावर टीका केली आहे. राज्यामध्ये अनेक ठिकाणी दुष्काळाची परिस्थिती गंभीर आहे, सरकारने दुष्काळ जाहीर करून पाच महिने झाले, मात्र लोकसभेच्या 10 दिवसांपूर्वी छावण्या सुरू केल्या. छावण्यांसाठी वेगवेगळे निकष लावल्याने अडचणी येत आहेत. सरकारला खरचं मदत करायची होती तर चार महिन्यांपूर्वी करायला हवी होती. आता विधानसभा निवडणूका डोळ्यासमोर ठेवून काम केलं जातं असल्याची शंका येत असल्याचं ते म्हणाले.