रामजन्मभूमी-बाबरी मशिद खटल्याची सुनावणी कोणत्याही स्थितीत १८ ऑक्टोबरपर्यंत संपविण्यात यावी

खबर जगाची सायंकाळच्या सुपरफास्ट हेडलाईन‼ वृत्तसंकलन : गुरुराज माशाळ

नवी दिल्ली : अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशिद खटल्याची सुनावणी कोणत्याही स्थितीत १८ ऑक्टोबरपर्यंत संपविण्यात यावी. १८ ऑक्टोबरनंतर या प्रकरणाच्या सुनावणीसाठी एकही जादा दिवस दिला जाणार नसल्याचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी गुरुवारी दोन्ही पक्षकारांना सांगितले.

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजधानी दिल्लीत भाजपची कोअर ग्रुपची बैठक सुरु झाली आहे. या बैठकीला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, कार्यकारी अध्यक्ष जेपी नड्डा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, मंत्री पंकजा मुंडे, गिरीश महाजन उपस्थित राहिले आहेत.

पुणे : पुणे जिल्ह्यात अतिवृष्टीने हाहाकार उडाला आहे. आत्तापर्यंत पाऊस आणि पुराशी संबंधित घटनांमध्ये पुणे शहर आणि जिल्ह्यात एकूण ११ जणांचा मृत्यू झाला असून ४ जण बेपत्ता आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याचा धोका आहे. खेड शिवापूर येथे दर्गा परिसरात नाला शेजारी झोपलेले पाच जण वाहून गेले. त्यापैकी तीन जणांचे मृतदेह मिळाले असून दोघे बेपत्ता आहे. पुण्यातील वानवडी येथील पाण्यात वाहून गेलेले दोघे जण बेपत्ता आहेत.

पुणे : पुण्यात बुधवारी रात्री पडलेला अतिप्रचंड पाऊस आणि त्यामुळे ओढे आणि नाल्यांना आलेला पूर यामुळे सर्वाधिक नुकसान चारचाकी आणि दुचाकी गाड्यांचे झाले आहे. पुराच्या पाण्यात अनेक गाड्या वाहून गेल्या आहेत. तर हजारो गाड्या तळघरातील वाहनतळामध्ये अडकून पडल्या आहेत. यामुळे या गाड्याचे सर्वाधिक नुकसान झाले आहे.

अहमदनगर : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणामध्ये सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना क्लीन चीट दिली आहे. ‘मी दिलेल्या पुराव्यांमध्ये शरद पवार यांचे नाव कसे आले हे मला माहित नाही. या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे आणि दोषींवर कारवाई केली जावी’, अशी मागणी अण्णा हजारे यांनी केली.

सांगली : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वंचित बहुजन आघाडीला सांगलीमध्ये मोठा धक्का बसला आहे. धनगर समाजाचे नेते आणि वंचित बहुजन आघाडीचे महासचिव गोपीचंद पडळकर यांनी वंचित बहुजन आघाडीला रामराम ठोकला आहे. सांगलीमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत गोपीचंद पडळकर यांनी ही माहिती दिली.

सोलापूर : पावसाळा सुरू झाल्यापासून दडी मारलेल्या वरुणराजाने नुकतीच तीन दिवसांपासून सोलापूर शहरासह जिल्ह्यावर कृपाद़ृष्टी दाखवली असून, अवघ्या तीनच दिवसांत पावसाची सरासरी आकडेवारी 37 वरून 46 टक्क्यांवर पोहोचली आहे. खरीप हंगाम वाया गेल्यानंतर आता बळीराजाच्या रब्बी हंगामाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

ग्लोबल न्युज नेटवर्क: