माऊलींच्या पालखी सोहळ्याचे सोलापूर जिल्ह्यात उत्साही स्वागत
आज पहिले गोल रिंगण
नातेपुते / औदुंबर भिसे
येणे मुखे तुझे वर्णी गुण नाम ॥
हेचि मज प्रेम देयी देवा ॥
डोळे भरूनिया पाहिन तुझे मुख |
हेचि मज सुख देयी देवा ॥
या भावनेने आषाढी वारीने पंढरीस निघालेल्या श्री संत ज्ञानेश्वर माऊलींचे शनिवार दि.६ रोजी सकाळी ११ वाजता सोलापूर जिल्ह्याच्या सिमेवर धर्मपुरी येथे आगमन झाले. माऊलींसह लाखो वैष्णवांचे जिल्हा वासियांनी अत्यंत उत्साही व भक्तीमय वातावरणात स्वागत केले.
उद्या दि.७ रोजी पालखी सोहळ्यातील पहिले गोल रिंगण सदाशिवनगर (पुरंदावडे हद्दीत) येथे नव्याने तयार केलेल्या जागेत होणार आहे. त्यानंतर हा सोहळा माळशिरस मुक्कामी पोहोचेल.
सातारा जिल्ह्यातील शेवटच्या बरड मुक्कामानंतर सोहळा सकाळी ६.३० वाजता नातेपुतेकडे मार्गस्थ झाला. पहाटे सोहळा प्रमुख योगेश देसाई यांच्या हस्ते माऊलींची विधीवत पूजा व आरती करण्यात आली. आरतीनंतर पालखी सोहळा धर्मपुरीकडे मार्गस्थ झाला.
सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. या ढगाळ वातावरणात वारकर्यांची पावले पंढरीच्या दिशेने झपझप पडत होती. दिंड्यादिंड्यामध्ये भजनाला रंग भरत होता. सकाळचे काकड्याचे अभंग दिंड्यादिंड्यामधून गायले जात होते. टाळ, मृदुंगाच्या सुरेख साथीने गोड व कर्णमधुर चालीने वातावरण प्रसन्न बनले होते. पंढरी समीप आल्याने वारकर्यांमध्ये उत्साह संचारला होता.
सकाळच्या न्याहरीसाठी सोहळा सव्वा नऊ वाजता साधुबुवाच्या ओढ्याजवळ पोहोचला. रथातून माऊलींची पालखी उतरविण्यात आली. ती असंख्य भाविकांनी खांद्यावर घेवून माऊली माऊली नामाचा जयघोष करीत साधुबुवांच्या मंदिरात आणली. साधुबुवांच्या पादुकांवर माऊलींच्या पादुका ठेवून तेथे पूजा व आरती करण्यात आली.
यावेळी कुंभारगावकरांच्यावतीने ऍड.संपतराव कुंभारगांवकर यांनी प्रवचनाची सेवा केली. सकाळची न्याहरी झाल्यानंतर सकाळी १० वाजता हा सोहळा धर्मपुरीकडे मार्गस्थ झाला.
आषाढी वारी केव्हा येईल, पंढरपूरला केव्हा जाईन आणि विटेवर उभ्या असलेल्या सावळ्या विठुरायाला केव्हा भटेन या उत्कट ओढीने अलंकापूरीहून आलेल्या संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोबत लाखो वैष्णवांची मांदियाळी अखंड हरिनाम घेत झपझप पावले उचलत असून, या सोहळ्याने आज (शनिवार) सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला.
सदाशिवनगर येथील श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्यावतीने माऊलींसह वैष्णवांच्या स्वागतासाठी भव्य शामियाना उभारण्यात आला होता.
पालकमंत्री विजकुमार देशमुख, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले , अति . जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे , जिल्हा पोलिस अधिक्षक मनोज पाटील, अति . जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल झेंडे , आमदार रामहरी रूपनवर, प्रांताधिकारी शमा पवार , तहसिलदार अभिजीत पाटील, पोलिस उप अधीक्षक मंगेश चव्हाण , उप मुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील , पंचायत समिती सभापती वैष्णवीदेवी मोहिते पाटील, उपसभापती किशोर सुळ , माजी उपसभापती उत्तम जानकर, गटविकास अधिकारी स्मीता पाटील, कुलगुरू मृणालिनी फडवणीस , शंकरराव मोहिते-पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.चंद्रकांत कोळेकर, सरपंच बाजीराव काटकर , उत्तमराव माने शेंडगे यांच्यासह जिल्हा, तालुका प्रशासनाचे अधिकारी, पदाधिकारी व असंख्य भाविकांनी माऊलींसह वैष्णवांचे स्वागत करून माऊलींचे दर्शन घेतले. त्यानंतर पालखी सोहळ्याने सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला. धर्मपुरी कॅनॉल येथे माऊलीला दुपारी नैवेद्य दाखविण्यात आला तर वारकऱ्यांनी दुपारचे भोजन घेतले .
बरड मुक्कामानंतर शिखर शिंगणापूरच्या महादेवाच्या दर्शनासाठी गेलेले हजारो वारकरी शिंगापूर फाटा येथे सोहळ्यात पुन्हा सहभागी झाले. शिखर शिंगणापूरच्या डोंगरापासून पंढरपूरकडे निघालेल्या दिंड्यादिंड्यामधून
हरी हरा नाही भेद|
नका करू वाद ॥
असा शिव व विष्णू हे एकच आहेत. त्याची महती सांगणारे अभंग दिंड्यादिंड्यामधून गायले जात होते.
शिंगणापूर फाटा येथे सायंकाळचा विसावा घेवून सोहळा नातेपुतेकडे मार्गस्थ झाला. सायंकाळी नातेपुते ग्रामस्थांनी सोहळ्याचे स्वागत केले. सायंकाळी ६ वाजता हा सोहळा पालखी तळावर पोहोचला. समाज आरतीनंतर हा सोहळा नातेपुते मुक्कामी विसावला.
आज गोल रिंगण
श्री ज्ञानराजांच्या पालखी सोहळ्यातील पहिले गोल रिंगण उद्या रविवार दि.७ रोजी सदाशिवनगर येथील पुरंदावडे हद्दीतील नवीन जागेत होणार असून या रिंगण सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. रिंगण सोहळ्यानंतर हा सोहळा माळशिरस मुक्कामी पोहोचेल.
=======================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठीचे फेसबुक पेज लाईक करा.
व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा