‘मला माफ करा…’ पंतप्रधान मोदींनी मागितली देशावासियांची माफी!


कोरोना व्हायरसविरूद्धचा लढा कठीण आहे आणि त्याविरूद्ध कठोर निर्णय घेणे आवश्यक होते.

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या २१ दिवसांच्या देशव्यापी लॉकडाउनबद्दल देशवासियांची माफी मागितली आहे. ‘मन की बात’ या आपल्या विशेष कार्यक्रमातून त्यांनी देशातील जनतेशी संवाद साधला.

यावेळी पीएम मोदी म्हणाले की, ‘मला अनेक कठोर निर्णय घ्यावे लागले आहेत त्यासाठी मी आपली माफी मागतो. या निर्णयामुळे आपल्या आयुष्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. विशेषत: गरीब लोकांना. मला माहित आहे की, तुमच्यापैकी काहीजण माझ्यावर नाराज देखील असतील. पण ही लढाई जिंकण्यासाठी हे कठोर निर्णय घेणे आवश्यक होते.’ असं पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले. 

पुढे ते असं म्हणाले की, ‘कोरोना व्हायरसविरूद्धचा लढा कठीण आहे आणि त्याविरूद्ध कठोर निर्णय घेणे आवश्यक होते. भारतातील लोकांना सुरक्षित ठेवणे ही  महत्वाची गोष्ट आहे. मला माहिती आहे की, कोणालाही हेतूपूर्वक नियम तोडायचे नाहीत, परंतु असे काही लोक आहेत जे असं करत आहेत. त्या लोकांना माझं एकच सांगणं आहे की, जर त्यांनी या लॉकडाउनचे पालन केले नाही तर कोरोना व्हायरसच्या धोक्यापासून ते स्वतः वाचू शकत नाही.’ असं म्हणत मोदींनी नियम मोडणाऱ्यांना सुनावलं आहे. 

पंतप्रधान म्हणाले की, या रोगावर लवकर मात केली गेली पाहिजे आणि संपूर्ण भारत त्यासाठी प्रयत्न करत आहे.  लोकांचा बळी घेणं हा कोरोना व्हायरसचा हेतू आहे. म्हणूनच प्रत्येक मानवाने एकत्रित येऊन त्याला संपविण्याचा संकल्प केला पाहिजे. मी भारतीयांना आवाहन करतो की, काही दिवस त्यांनी ‘लक्ष्मण रेषेचे’चे पालन करावे. ज्या-ज्या देशातील लोकांनी लॉकडाऊनचं पालन केलं नाही ते लोकं आता पश्चात्ताप करत आहेत.

लागण झालेले लोक गुन्हेगार नाहीत’

पंतप्रधान म्हणाले की, मला अशा काही घटना समजल्या आहेत की, ‘ज्यात काही लोक कोरोना संशयित आणि होम क्वॉरेंटाइन केलेल्या लोकांशी गैरवर्तन करीत आहेत. अशा गोष्टी ऐकून मला खूप वेदना होत आहे, हे दुर्दैवी आहे. ही  लोकं काही गुन्हेगार नाही. तर त फक्त एका विषाणूला बळी पडले आहेत. इतरांना संक्रमणापासून वाचविण्यासाठी ही लोकं स्वत:ला वेगळं ठेवत आहेत.  बर्‍याच ठिकाणी लोकांनी आपल्या जबाबदाऱ्या गांभीर्याने घेतल्या आहेत. कोरोना व्हायरसविरूद्ध लढण्याचा  सर्वात प्रभावी मार्ग हा सोशल डिस्टेंसिंग आहे. परंतु आपल्याला हे समजून घ्यावे लागेल की, सोशल डिस्टेंसिंगचा हा अर्थ नाही की, आपण सामाजिक परस्पर संबंध संपवणे. खरं तर ही तीच वेळ आहे जी आपल्या सर्व जुन्या सामाजिक संबंधांना पुन्हा नव्याने बनवण्याची. 

मोदी पुढे असंही म्हणाले की, आपण कोरोना व्हायसरसविरूद्ध लढा देणार्‍या आघाडीच्या सैनिकांना, विशेषत: परिचारिका, डॉक्टर आणि पॅरामेडिकल कर्मचार्‍यांकडून प्रेरणा घ्यावी. हे सैनिक त्यांच्या घरातून नव्हे तर घराबाहेरुन कोरोनो व्हायरसशी लढत आहेत.

ग्लोबल न्युज नेटवर्क: