भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी जे. पी. नड्डा यांची बिनविरोध निवड

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष व अमित शहा यांचे उत्तराधिकारी म्हणून केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांची निवड करण्यात आली आहे. माजी केंद्रीय मंत्री व निवडणूक अधिकारी राधा मोहन सिंह यांनी जे. पी. नड्डा यांच्या नावाची भाजपाच्या अध्यक्षपदी बिनविरोध म्हणून घोषणा केली आहे. यावेळी भाजपाचे मावळते राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यासह भाजपाचे इतर नेते उपस्थित होते.  

भाजपाच्या अध्यक्षपदी जे. पी. नड्डा यांचे नाव आधीपासूनच जवळपास निश्चित झाले होते. मात्र, त्यांच्या नावाची औपचारिक घोषणा बाकी होती. अमित शाह यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर नवे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जे. पी. नड्डा यांचे नाव चर्चेत होते. पण, त्यावेळी त्यांची  कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. आता त्यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.  

राज्यसभेचे सदस्य असलेले जे. पी. नड्डा पक्षाच्या सर्वोच्च संसदीय बोर्डचे सचिवही आहेत. भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांचा कार्यकाळ जानेवारी २०१९ मध्ये पूर्ण झाला. लोकसभा निवडणुका लक्षात घेऊन अध्यक्षपदासाठीची निवडणूक टाळली गेली. अमित शहा केंद्रीय गृहमंत्री बनल्यामुळे जे. पी. नड्डा यांना जून महिन्यात कार्यकारी अध्यक्ष बनवले गेले. जे. पी. नड्डा मोदी सरकार-१ मध्ये आरोग्य मंत्री होते. विद्यार्थी जीवनापासून ते राजकारणात सक्रिय होते.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि संघटनेत त्यांनी वेगवेगळ््या जबाबदा-या पार पाडल्या. ते पहिल्यांदा १९९३ मध्ये हिमाचल प्रदेश विधानसभेचे सदस्य बनले. नंतर ते राज्यात व केंद्रातही मंत्री बनले होते.

ग्लोबल न्युज नेटवर्क: