पाकिस्तानने भारतासोबतचे व्यापारी संबंध तोडले, भारतीय उच्चायुक्तांना परत पाठवणार

ग्लोबल न्यूज नेटवर्क: जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द करण्याचा भारताचा निर्णय पाकिस्तानला चांगलाच झोंबला आहे. पाकिस्तानने भारतासोबतचे द्विपक्षीय व्यापारी संबंध तोडण्याचा निर्णय घेतला आहे तसेच राजनैतिक संबंधांचा स्तरही घटवणार असल्याचे म्हटले आहे.

पाकिस्तान आपल्या उच्चायुक्तांना भारतात पाठवणार नसल्याचे समजते. पाकिस्तानने भारतासाठी नियुक्त केलेले उच्चायुक्त या महिन्यात पदभार संभाळणार होते. त्याचवेळी भारताचे उच्चायुक्त अजय बिसारीया यांना पाकिस्तान सोडण्यास सांगितले आहे. बुधवारी झालेल्या पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताने कलम ३७० हटवण्याच्या घेतलेल्या निर्णयाला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी पाकिस्तानी लष्कराला नियंत्रण रेषेवर सर्तक राहण्याचेही निर्देश दिले आहेत. इम्रान खान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला पाकिस्तानचे लष्करी अधिकारीही उपस्थित होते.

जम्मू-काश्मीरला लागू असलेले कलम ३७० रद्द करुन दोन भागांमध्ये विभाजन करण्यासंबंधीचे विधेयक राज्यसभेपाठोपाठ काल लोकसभेतही मंजूर झाले. जम्मू-काश्मीर आणि लडाख असे दोन नवे केंद्रशासित प्रदेश बनणार आहेत. पाकिस्तानी लष्कराची काल काश्मीरसंबंधी विशेष बैठक झाली. त्यामध्ये पाकिस्तानी लष्कराने काश्मीरसाठी कुठल्याही पातळीपर्यंत जाऊ असे म्हटले आहे. भारताच्या निर्णयावरुन पाकिस्तानची आगपाखड सुरु आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आणखी पुलवामा घडतील असेही म्हटले आहे.

=======================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठी चे फेसबुक पेज
व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा

ग्लोबल न्युज नेटवर्क: