सोलापूर : माढ्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार संजयमामा शिंदे यांचे गाव असलेल्या निमगाव टें. (ता. माढा) येथील भाजपच्या पोलिंग एजंटला हाकलून दिल्याने या गावात फेर मतदान घ्यावे अशी मागणी माढ्याचे भाजप उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी केली होती. भाजपने नियुक्त केलेला पोलिंग एजंट त्या गावातील नसल्याने निंबाळकरांची ही मागणी फेटाळून लावण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार पोलिंग एजंट हा त्याच बुथमधील असणे आवश्यक असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी दिली.
मंगळवारी (ता. 23) माढा लोकसभा मतदार संघासाठी मतदान झाल्यानंतर करमाळा, माढा, सांगोला, माळशिरस, फलटण, माण येथून मतदान यंत्र सोलापुरातील रामवाडी गोदामात आणण्यात आली आहेत. आज दिवसभर जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले व निवडणूक निर्णय अधिकारी रामचंद्र शिंदे यांच्यासह निवडणूक निरीक्षकांच्या उपस्थितीत ही मतदान यंत्र सील करण्यात आली आहेत.
संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या माढा लोकसभा मतदारसंघात सकाळी 11 च्या सुमारास राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार संजय शिंदे यांच्या निमगावसह अन्य काही गावांमधील भाजपच्या पोलिंग एजंटांना मतदान केंद्रांवरुन हाकलल्याचा आरोप करत येथील मतदान प्रक्रिया रद्द करावी, फेर मतदान घ्यावे आणि संबंधित केंद्रांवरील अधिकाऱ्यांना निलंबीत करावे, अशी मागणी भाजपचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांनी केली होती त्यावर हा निकाल देत ही मागणी फेटाळून लावण्यात आली.