देशात दोन मुलं जन्माला घालण्याचा कायदा असणं गरजेचं – मोहन भागवत

नवी दिल्ली | सरसंघचालक मोहन भागवत यांनी दोनच मुलं जन्माला घालण्यासंबंधीचा कायदा देशात असणं गरजेचं असल्याचे मत व्यक्त केले आहे. आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अजेंड्यावर लोकसंख्या नियंत्रण हा विषय असल्याचं मोहन भागवत यांच्या वक्तव्यावरुन स्पष्ट होत आहे. उत्तर प्रदेशातील मुरादाबादमध्ये संघाच्या एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना मोहन भागवत यांनी असे वक्तव्य केले आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुरादाबादमध्ये मोहन भागवतांनी हे वक्तव्य केलं. त्यांनी बंद दाराआड झालेल्या एका चर्चेत देशात दोन मुलं जन्माला घालण्याचा कायदा आणला पाहिजे असं म्हटलं आहे. यासोबतच ‘लवकरच एका भव्य राम मंदिराची निर्मिती करण्यात येईल. राम मंदिर ट्रस्ट स्थापन झाल्यानंतर संघ राम मंदिराच्या मुद्द्यापासून वेगळा होईल. सध्या देशामधील वाढती लोकसंख्या चिंता वाढवणारी आहे. यामुळे दोन मुलं जन्माला घालण्याचा कायदा असायला हवा. असे केल्यास लोकसंध्या नियंत्रणात येईल. असे भागवत यांनी चर्चेदरम्यान म्हटलं आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये याविषयी वृत्त देण्यात आले आहेत.

मात्र मोहन भागवत यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादीकडून टीका करण्यात आली आहे. जबरदस्तीने नसबंदी करणार का? असा सवाल राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांच्याकडून करण्यात आला आहे.

डाव्या विचारसरणीच्या पक्षांकडून नेहमीच भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संविधानात बदल करणार असल्याचे आरोप केले जात असतात. सोशल मीडीयावर सध्या मोहन भागवत भारताचे नवीन संविधान बनवत असल्याची एक पीडीएफ फाईल व्हायरल होत आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. भागवत नवीन भारतीय संविधान बनवत असल्याचा खोटा प्रचार करण्यात येत आहे. त्याची एक पीडीएफ फाईल बनवून व्हॉट्सअ‍ॅपवर फिरवण्यात येत आहे.

या पीडीएफ फाईलच्या मुखपृष्ठावर सरसंघचालकांचे छायाचित्र वापरण्यात आले आहे. मात्र संघाने हे सर्व फेटाळले आहे. हा बदनामी करण्याचा प्रकार असल्याचे संघाने सांगितले आहे. सोशल मीडियावर चुकीची माहिती टाकणाऱ्यांवर कारवाई करावी अशी तक्रार संघाकडून पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: