डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, अमेरिका भारतावर प्रेम करतं.’ 

ह्यूस्टन (अमेरिका): ह्यूस्टनच्या एनआरजी स्टेडियममध्ये  Howdy Modi कार्यक्रमात बोलताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला चांगलंच सुनावलं आहे. यावेळी ते भारताच्या बाजूने असल्याचंही स्पष्ट झालं. ट्रम्प या कार्यक्रमात बोलताना असं म्हणाले की, ‘दहशतवाद हा आज एक अतिशय गंभीर विषय आहे.

अमेरिकेला ही गोष्ट पूर्णपणे ठाऊक आहे. भारतीय आणि अमेरिकन नागरिकांच्या सुरक्षेसाठी आम्ही सोबत मिळून काम करत आहोत.’ आजवर ट्रम्प यांनी कधीही असं वक्तव्य केलेलं नव्हतं की, ज्यात ते पाकिस्तानविरुद्ध आणि भारताच्या बाजूने आहेत असं दिसून येईल.

पण काल राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी ज्या पद्धतीने भाषण केलं त्यामुळे बऱ्याच गोष्टी बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एवढंच नव्हे तर आंतरराष्ट्रीय समीकरणं देखील बदलण्याची शक्यता आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेला पोहचताच डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांचं जोरदार स्वागत केलं. ह्यूस्टनला रवाना होत असताना ट्रम्प यांनी ट्वीट केलं की, ‘मित्रासोबत वेळ घालविण्यासाठी उत्साहित आहे.’ यानंतर पंतप्रधान मोदींनीही ट्वीट केलं की, ‘तुमच्या भेटीची वाट पाहत आहे.’ यानंतर ट्रम्प यांनी ट्वीट केलं की, ‘अमेरिका भारतावर प्रेम करतं.’ 

ह्यूस्टनमधील आपल्या भाषणात ट्रम्प स्पष्ट शब्दात म्हणाले की, ‘भारताची इस्लामी दहशतवाद आणि सीमा सुरक्षेबाबतची चिंता ही रास्त आहे. अमेरिका देखील त्याचं समर्थन करतं.’ खरं तर पाकिस्तानसाठी हा मोठा धक्काच आहे. तेही अशा वेळी की, जेव्हा  पाकचे पंतप्रधान इमरान खान यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना काश्मीर प्रकरणात हस्तक्षेप करण्याची गळ घातली होती. 

पाकिस्तानला डबल डोस: 

डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या भाषणात पाकिस्तानला चांगलाच झटका दिला. पण त्यानंतर भाषण करण्यासाठी आलेल्या नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानवर थेटच हल्लाबोल केला. यावेळी मोदी असंही म्हणाले की, ट्र्म्प हे भारताच्या पूर्ण पाठिशी आहेत. 

‘आम्ही देशात कलम ३७० सारख्या अनेक जुन्या कायद्यांना अलविदा केला आहे. भारत आपल्या देशात जे काही करत आहे त्याने इतरांना मात्र खूपच त्रास होत आहे. या लोकांना आपला स्वत:चा देश सांभाळता येत नाही. यांनी कायम द्वेषाचंच राजकारण केलं आहे. ही अशी लोकं आहे की, ज्यांना जगात शांतता नकोय. कारण ते दहशतवादाचं समर्थन करतात, दहशतवादाला खतपाणी घालतात. त्यांची ओळख आपल्याला चांगलीच ठाऊक आहे. अमेरिकेतील ९/११ असो किंवा भारतातील २६/११ असो या सगळ्यामागचे दहशतवादी कुठे सापडतात?’ असं म्हणत मोदींनी पाकिस्तानवर निशाणा साधला. 

दरम्यान, भारत आणि अमेरिकेतील मैत्रीचे संबंध दृढ होत असल्याने पाकिस्तानचा तीळपापड होणं साहजिकच आहे. त्यामुळे आता येत्या काळात अमेरिका नेमकी कशी भूमिका घेणार? हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे

ग्लोबल न्युज नेटवर्क: