जाणून घ्या X, Y, Z आणि Z+ सुरक्षेत नक्की काय मिळते?

महाराष्ट्रातील नव्या महाविकास आघाडी सरकारने काही मान्यवरांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा तर त्याचवेळी काहींच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरची सुरक्षा कमी करण्यात आली आहे. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. आदित्य ठाकरे यांना झेड सुरक्षा देण्यात आली आहे. याआधी त्यांना वाय प्लस सुरक्षा होती. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे.  

कोणत्या गटातील सुरक्षेत नक्की काय मिळते हे जाणून घेऊया…

एक्स स्तरिय सुरक्षा
एक्स सुरक्षाव्यवस्थेमध्ये केवळ दोन सुरक्षारक्षकांचा समावेश असतो. यामध्ये कमांडोंचा समावेश नसतो. या सुरक्षाव्यवस्थेत एक वैयक्तिक सुरक्षा अधिकाऱ्याचा (पर्सनल सिक्युरिट ऑफिसर) समावेश असतो.

वाय स्तरिय सुरक्षा
वाय स्तरावरील सुरक्षेत ११ सुरक्षारक्षकांचा ताफ्यात समावेश असतो. यामध्ये एक किंवा दोन कमांडो आणि दोन वैयक्तिक सुरक्षा अधिकारीही असतात. देशातील सर्व व्हीआयपींना ही सुरक्षा दिली जाते.

झेड स्तरिय सुरक्षा
झेड स्तरावरील सुरक्षेत संबंधित मान्यवरांच्या सुरक्षेसाठी २२ सुरक्षारक्षक कार्यरत असतात. यामध्ये नॅशनल सिक्युरिटी गार्डचे (एनएसजी) ४ किंवा ५ कमांडो यांचाही समावेश असतो. अतिरिक्त सुरक्षारक्षक राज्यातील पोलिस दलाकडून किंवा केंद्रीय राखीव पोलिस दलाकडून दिले जातात. यामध्ये एक एस्कॉर्ट गाडीही दिली जाते. या व्यवस्थेत कमांडोंकडे मशिनगन आणि इतरही सुरक्षा उपकरणे असतात. या सुरक्षाव्यवस्थेतील सुरक्षारक्षकांना कोणत्याही शस्त्रांशिवाय हल्ला करणाऱ्यांशी लढा देण्याचे प्रशिक्षण दिलेले असते.

झेड प्लस स्तरिय सुरक्षा
झेड प्लस सुरक्षा व्यवस्थेत ३६ सुरक्षारक्षकांचा समावेश असतो. यामध्ये एनएसजीचे १० कमांडो असतात. या सर्व कमांडोंकडे अत्याधुनिक शस्त्रे असतात. याही सुरक्षाव्यवस्थेत एस्कॉर्ट गाडीचा समावेश असतो. अत्यंत मोठ्या आणि जीविताला जास्त धोका असलेल्या मान्यवरांना ही सुरक्षा पुरविली जाते.

आपल्या देशात
नेतेमंडळी,अधिकारी किंवा कोणत्याही व्यक्तीच्या सुरक्षेची धमकी लक्षात घेता भारतात त्यांना सरकार आणि पोलिसांनी सुरक्षा पुरविली आहे. धोके लक्षात घेता झेड प्लस, झेड, वाय किंवा एक्स श्रेणीचे संरक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. असे संरक्षण मिळवणारे बहुतेक लोक म्हणजे केंद्र सरकारचे मंत्री, राज्यांचे मुख्यमंत्री, सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, प्रसिद्ध राजकारणी आणि काही वरिष्ठ नोकरशहा. सध्या भारतातील सुमारे 450 लोकांना सुरक्षा प्रकारचा प्रकार मिळाला आहे. त्यापैकी 15 झेड प्लस प्रकारात संरक्षित आहेत.

ग्लोबल न्युज नेटवर्क: