जगभरात कोरोनाचा दुसरा प्राणघातक प्रार्दुभाव होण्याचा , WHO चा इशारा

कोविड१९ या विषाणूच्या संसर्गामुळे पसरणारा कोरोना आजार आणखी मोठा विनाश करणार. कोरोना संकटाचा  दुसरा प्राणघातक फेरा येणार आहे. आफ्रिकेतील लोकांमुळे कोरोना संकट आणखी प्राणघातक होणार आहे, असा धोक्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेचे (वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन) प्रमुख टेड्रोस ऍधानॉम घेबरेयेसस यांनी दिला.

कोरोना पसरत असल्याचा इशारा वेळेवर दिला नाही, असा आरोप करत अमेरिका, जपानसह जगातील अनेक देशांनी जागतिक आरोग्य संघटनेवर टीका केली आहे. या पार्श्वभूमीवर संघटनेने धोक्याचा इशारा दिला आहे. 

येणाऱ्या काळात कोरोना आफ्रिकेतून मोठ्या प्रमाणावर पसरेल. आफ्रिकेतील अनेक देशांमध्ये अपुऱ्या आरोग्य सुविधांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळवणे कठीण झाले आहे. तिथूनच  आजाराचा जगभर घातक प्रार्दुभाव होईल, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी दिला.

जगात कोरोनाचे थैमान

जगातील २१३ देशांतील २४ लाखांपेक्षा जास्त नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. यापैकी १ लाख ७० हजार ४७० जणांचा मृत्यू झाला आहे. या आजाराचा आणखी मोठ्या प्रमाणावर प्राणघातक प्रार्दुभाव होण्याची शक्यता जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली आहे. 

चीनमध्ये आफ्रिकेतील नागरिकांना वाईट वागणूक

अमेरिकेसह अनेक विकसित देशांनी चीनवर कोरोना पसरवल्याचा आरोप केला आहे. पण चीनमध्ये आफ्रिकेतील नागरिकांमुळेच कोरोनाचा प्रार्दुभाव होत असल्याची चर्चा जोर धरत आहे. चीनच्या काही भागांमध्ये आफ्रिकेतून नोकरीसाठी आलेल्या नागरिकांना वाईट  वागणूक दिली जात आहे. हे सुरू असताना जागतिक आरोग्य संघटनेने आफ्रिकेतून कोरोनाचा  धोका असल्याचे वक्तव्य केले आहे. 

कोरोनावर लस अद्याप सापडलेली नाही

कोरोना विषाणूच्या क्षमतांविषयी अद्याप पुरेशी माहिती मिळालेली नाही. आजारावर लस विकसित झाली नसल्यामुळे कोरोना संकट इतक्या लवकर आटोक्यात येणार नाही, असे जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे. जगातील काही देशांमध्ये लॉकडाऊनचे व्यवस्थित पालन होत नाही तर काही देशांनी लॉकडाऊन शिथील केले आहे. यामुळे कोरोनाचे संकट पसरण्याचा धोका असल्याचेही संघटनेने सांगितले. 

चीनचे मौन

कोरोना आजाराचे रुग्ण सर्वात आधी चीनमध्ये आढळले. जगात कोरोना थैमान घालू लागल्यावर अचानक चीनमधील कोरोना संकट नियंत्रणात आले. हे कसे घडले याबाबत चीन जगाला जास्त माहिती देणे टाळत आहे. या मौनामुळे चीनविषयी जगात संशयाचे वातावरण आहे. हा संशय वाढत असतानाच जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना संकट आफ्रिकेमुळे मोठा विनाश करेल असा धोक्याचा इशारा दिला आहे. या इशाऱ्यामुळे जागतिक पातळीवरील चिंतेत भर पडली आहे.

WHO प्रमुखांचे संशयास्पद वर्तन

जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस ऍधानॉम घेबरेयेसस हे मूळचे इशिओपियाचे आरोग्यमंत्री आहेत. त्यांना चीनच्या पाठिंब्यामुळे त्यांना जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुखपद मिळाले आहे. एका विकसनशिल देशातील आरोग्य मंत्र्याला संधी मिळाल्यास अनेक गरीब देशांचे प्रश्न आरोग्य संघटना व्यवस्थित हाताळेल, या आशेतून अनेक विकसनशिल देशांनी टेड्रोस ऍधानॉम घेबरेयेसस यांना पाठिंबा दिला होता. पण प्रमुखपद मिळाल्यापासून घेबरेयेसस सतत चीनचे कौतुक करण्यात गुंतल्याचे चित्र आहे.

कोरोना संकट वाढत असताना जगाला सावध करण्यात संघटना कमी पडली, असाही आरोप अनेकांनी केला. पण या आरोपाला उत्तर देण्याऐवजी चीनच्या नेत्यांच्या संपर्कात राहण्यात घेबरेयेसस यांनी धन्यता मानली. कोरोनाप्रश्नी चीनला जाब विचारण्याऐवजी आफ्रिकेतून कोरोना आणखी पसरेल, असे सांगणे त्यांनी पसंत केले. घेबरेयेसस यांच्या या वर्तनामुळे त्यांनी दिलेला इशारा हा खरा मानावा की चीनच्या सांगण्यावरुन केलेले नवे वक्तव्य असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: