‘गोव्यातही राजकीय भूकंप होणार, भाजपचं सरकार पडणार;’ संजय राऊतांचं भाकीत

मुंबई । शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केलेल्या दाव्यामुळे देशाच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. गोव्यातही भाजपचं सरकार पडणार असल्याचा दावा संजय राऊतांनी केला आहे. 
महाराष्ट्रानंतर आता शिवसेनेचं मिशन गोवा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. गोव्यात शिवसेना नवी आघाडी स्थापन करण्याच्या प्रयत्नात आहे. तेथील विजय सरदेसाईंसह चार आमदार शिवसेनेच्या संपर्कात असल्याचं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे. यामुळे गोव्यातही राजकीय भूकंप होणार असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की ‘गोव्यामध्ये लवकरच भूकंप होईल. विजय सरदेसाई त्यांच्या सर्व आमदारांसह इथे हजर आहेत.’  सरकारला पाठिंबा देणारे  इतर काही आमदरही आमच्या संपर्कात असल्याचं राऊत यांनी सांगितले. संजय राऊत यांनी सांगितले की त्यांचे सुदीन ढवळीकरांशीही बोलणे झाले आहे. ‘ गोव्यातील सरकार हे अनैतिकतेच्या पायावर उभे आहे. लवकरच गोव्यात फार मोठी हालचाल झालेली दिसेल.’ असे संजय राऊत म्हणाले. फक्त गोवाच नाही तर संपूर्ण देशात हालचाल झालेली दिसेल आणि बिगरभाजप एक आघाडी उभी करण्याचा आमचा प्रयत्न असेल असे त्यांनी सांगितले. विजय सरदेसाई आणि सुदीन ढवळीकर हे दोघेही गोव्याचे उपमुख्यमंत्री होते.

विजय सरदेसाई यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की जे महाराष्ट्रात झाले तेच गोव्यामध्येही करण्याचा ते प्रयत्न करणार आहेत. सरदेसाई म्हणाले की ‘आमचा प्रादेशिक पक्ष आहे, जो गोव्याच्या भल्यासाठी लढतो आहे. जे महाराष्ट्रात झालं ते संपूर्ण देशात व्हायला हवं असं आमचं मत आहे. आम्ही शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससोबत काम करू आणि एक चांगली आघाडी निर्माण करू. आघाडीसाठी पाया रचला जावा यासाठी  प्रयत्न करायला आलो आहे.’

दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदी विराजमान होताच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षनेत्याच्या भूमिकेत गेल्याचे लगेच दिसून आले. ट्विटरद्वारे फडणवीसांनी नव्या सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. फडणवीस ट्विटरवर म्हणाले की, “या सरकारकडे बहुमत असेल तर लपून-छपून सभागृह बोलावण्याचा निर्णय का? ‬नियमबाह्य पद्धतीने प्रो-टेम अध्यक्ष बदलण्याचा प्रयत्न कशासाठी? ‬स्वत:च्या आमदारांवर अजूनही इतका अविश्वास का? ‬अजूनही त्यांना डांबून ठेवण्याची शिक्षा का?‬ अशा अनेक सवालांची तोफ फडणवीस यांनी डागली आहे.

भाजपने विरोधी पक्षात बसण्याची घोषणा केली असताना आणि महाविकास आघाडीने निरनिराळ्या प्रकारे बहुमताचे प्रदर्शन आणि दावे केले असताना ही लपवा-छपवी आणि भीती का? ‬महाराष्ट्राला याचे उत्तर हवे आहे!” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

फडणवीसांच्या टीकेला उत्तर देताना संजय राऊत यांनी टोला लगावला आहे. राऊत म्हणाले की, “त्यांना सत्तेत नसण्याची सवय व्हायला वेळ लागेल. थोडा वेळ लागेल, थोडं अवघड जाईल पण सवय होईल. मला खात्री आहे की ते विरोधी पक्षनेत्याची भूमिका चोख बजावतील.” दरम्यान, गोव्यातही राजकीय भूकंप होण्याच्या राऊत यांच्या दाव्यामुळे विविध चर्चांना उधाण आले आहे. महाराष्ट्रातील भाजप विरुद्ध शिवसेना हा सामना आता देशपातळीवर पोहोचल्याचे यानिमित्ताने बोलले जात आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: