कर्नाटक निकालानंतर देवेंद्र फडणवीसांचा ट्विटरवरुन हल्लाबोल

नवी दिल्ली । जर कोणी जनादेशाचा अनादर करीत असेल तर मतदार त्याला जास्त काळ सहन करीत नाही, हेच कर्नाटक पोटनिवडणुकीच्या निकालांतून दिसून आले असल्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. त्यांनी ट्विटच्या माध्यमातून कर्नाटकमधील भाजपचे अभिनंदन केले. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येऊन सरकार स्थापन केले. त्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केलं आहे.  देवेंद्र फडणवीस ट्विटमध्ये म्हणतात की, संधीसाधू राजकारणाला लोक कसे उत्तर देतात हे दिसून आले. जनादेश नसतानाही केवळ सत्तेसाठी एकत्र येणाऱ्यांनाही लोकांनी या निकालातून उत्तर दिले आहे. जनादेशाचा अनादर करणाऱ्यांना लोक जास्त काळ सहन करीत नाहीत हेच सिद्ध झाले आहे

कर्नाटक विधानसभेच्या 15 जागांच्या पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार 15 पैकी 6 जागांवर भाजपने विजय मिळवला असून 6 जागांवर निर्णायक आघाडी घेतली आहे. यामुळे बी. एस. येडियुराप्पा यांच्या सरकारसमोरील धोका टळला असून येडियुराप्पा हेच मुख्यमंत्रिपदी कायम राहणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. ‘जनमताचा अपमान करून मागच्या दारानं चोरांप्रमाणं सरकार स्थापन करणाऱ्या काँग्रेसला कर्नाटकच्या जनतेनं धडा शिकवला आहे,’ अशी जोरदार टीका करतानाच, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापणाऱ्या शिवसेनेलाही अप्रत्यक्षपणे टोला हाणला आहे.

‘कर्नाटक पोटनिवडणुकीचा निकाल हा देशातील सर्वच राजकीय पक्षांसाठी संदेश आहे की, जर कोणी जनादेशाच्या विरोधात जात असेल आणि लोकांचा विश्वासघात करत असेल, जनतेचा पाठीत खंजीर खुपसत असेल तर संधी मिळताच लोक त्याला उत्तर देतात,’ असं म्हणत मोदींनी शिवसेनेवर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: