कर्नाटकातील राजकीय पेच झाला तीव्र,राज्यपालांचे निर्देश धुडकावले

कर्नाटकचे राज्यपाल वजूभाई वाला यांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी घालून दिलेली वेळेची मर्यादा मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी सरकारने ओलांडली आहे. अद्याप कर्नाटक विधानसभेत विश्वासदर्शक प्रस्तावावर मतदान झालेले नाही. त्यातच काँग्रेसचे गटनेते सिद्धरामय्या यांनी आज मतदान होण्याची शक्यता नसल्याचे स्पष्ट केल्याने कर्नाटकमधील राजकीय पेच आणखी तीव्र होण्याचे संकेत आहेत. 

सभागृहाचे कामकाज कसे चालवायचे, हे राज्यपाल ठरवू शकत नाही, असे कर्नाटकमधील मंत्री कृष्णा बायरेगौडा यांनी शुक्रवारी सभागृहातच सांगितले. त्यावरून राज्यपाल विरुद्ध सरकार असाही कंगोरा कर्नाटकमधील राजकीय पेचाला जोडला जाण्याची शक्यता आहे. ते म्हणाले, विश्वासदर्शक प्रस्ताव ही सभागृहाची कामकाज पद्धती आहे. सभागृहाचे कामकाज कसे चालवायचे हे राज्यपाल ठरवू शकत नाहीत. 

कर्नाटकमधील विधानसभेत गुरुवारी कुमारस्वामी यांनी एक ओळीचा विश्वासदर्शक प्रस्ताव मांडला. त्यानंतर त्यावरील चर्चेला सुरूवात झाली. पण दुपारनंतर घडलेल्या नाट्यमय घडामोडींमुळे कामकाज शुक्रवारपर्यंत तहकूब कऱण्यात आले. त्यातच राज्यपालांनी कुमारस्वामी यांना पत्र लिहून शुक्रवारी दुपारी दीड वाजेपर्यंत सभागृहात बहुमत सिद्ध करण्यास सांगितले. ही वेळ मर्यादा आता ओलांडली गेली आहे. सभागृहात अद्याप प्रस्तावावर मतदान झालेले नाही. 

दीड वाजल्यानंतर भाजपचे नेते बी एस येडियुरप्पा यांनी विधानसभा अध्यक्षांकडे लगेचच मतदान घेण्याची मागणी केली. त्यांनी राज्यपालांच्या निर्देशांची आठवण करून दिली. यावर अध्यक्ष के आर रमेशकुमार यांनी येडियुरप्पा यांची मागणी फेटाळली. ते म्हणाले, तुम्हाला जरा जास्तच गडबड आहे, हे आम्हाला समजतंय. पण विश्वासदर्शक प्रस्तावावरील चर्चा पूर्ण झाल्याशिवाय मतदान घेतले जाऊ शकत नाही. हा नियमच आहे.

कुमारस्वामी यांनीही मतदान कधी घ्यायचे याविषयी विधानसभा अध्यक्षांनीच निर्णय घ्यावा, असे म्हटले आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: