‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’, भाजपकडून नरेंद्र मोदींची थेट छत्रपती शिवरायांशी तुलना..

आज भाजपच्या दिल्ली येथील मुख्य कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या धार्मिक सांस्कृतिक संमेलनात भाजप नेते जय भगवान गोयल यांच्या हस्ते नरेंद्र मोदी यांची तुलना चक्क छत्रपती शिवरायांशी करण्यात आलेल्या एका पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले आहे.

या पुस्तकाचे नाव ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ असे आहे. या पुस्तकावर महाराष्ट्र व देशभरातून मोठ्या प्रमाणावर टीकेची झोड उठली असून, जय भगवान गोयल यांना प्रचंड ट्रोल करण्यात येत आहे. या पुस्तकाच्या नावातच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवरायांशी करण्यात आल्याने जनतेतुन संताप व्यक्त करण्यात येत आहे.

दिल्लीतील भाजप कार्यालयात एका धार्मिक सांस्कृतिक संमेलनात जय भगवान गोयल यांच्या हस्ते या पुस्तकाचे विमोचन करण्यात आले आहे. या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात मनोज तिवारी, श्याम जाजू, महेश गिरी, जे.पी. नड्डा उपस्थित होते.

या प्रकाशन समारंभाविषयीची माहिती जय भगवान गोयल यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केल्यानंतर देशभरातून याचा निषेध करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना ‘आज के शिवाजी’ अशी उपमा देण्यात आल्याने ‘त्यांची शिवरायांशी तुलना करण्याचा प्रयत्न करणे’ हे एका कारस्थानाचा भाग असल्याचा आरोप करत त्यांच्यावर जोरदार टिका होत आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: