पंढरपूर – माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे यांचा कोणत्याही परिस्थितीत पराभव करायचा असा चंग भाजपाच्या वरिष्ठांनी बांधला होता. यासाठी येथील सारी सूत्रं अकलूजच्या मोहिते पाटील गटाच्या हाती देण्यात आली होती. याच अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा घेण्यात आली. माळशिरसच्या मताधिक्क्यावरच येथील निर्णय अवलंबून होता. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विजयानंतर मोहिते पाटील यांचा दबदबा भाजपात वाढणार हे निश्चित आहे.
माळशिरस मतदारसंघ हा विजयसिंह मोहिते पाटील यांचा बालेकिल्ला आहे. येथील स्थानिक स्वराज्य संस्था, सहकार यावर मोहिते पाटील गटाचे वर्चस्व आहे. या भागात लोकसभा व विधानसभा निवडणुकीत या गटाची सारी सूत्रं सहकार महर्षी साखर कारखान्याचे अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील हे सांभाळत असतात. तेच विधानसभा व लोकसभेसह अन्य निवडणुकांचे किंग मेकर म्हणूून प्रसिध्द आहेेत. यंदा ही लोकसभा निवडणुकीत मोहिते पाटील गटाने भाजपात प्रवेश केल्यानंतर माढा मतदारसंघात त्यांची भूमिका निर्णायक ठरणार हे निश्चित झाले होते. राष्ट्रवादीने मोहिते पाटील विरोधक संजय शिंदे यांना येथून उमेदवारी दिली होती व त्यांना पराभूत करण्यासाठी माळशिरसमधून जास्तीत जास्त मताधिक्क्य भाजपाचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांना देण्याचा चंग जयसिंह मोहिते पाटील यांनी बांधला होता. यावरून शिंदे व मोहिते पाटील यांच्यात शाब्दिक युध्द ही रंगले होते.
माढा मतदारसंघ हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व भाजपासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत प्रतिष्ठेचा केला होता. संजय शिंदे यांनी ऐनवेळी भाजपाची साथ सोडल्याचे शल्य भाजपा व महाआघाडीच्या नेत्यांमध्ये होते व त्यांनी शिंदे यांच्या पराभवासाठी कंबर कसली. यात मोहिते पाटील यांची साथ मिळाली. 2014 ला याच मतदारसंघातून विजयसिंह मोहिते पाटील यांनी विजय मिळविला होता वर 2009 ला पवार यांच्यासाठी व्यूहरचना आखली होती. यामुळे सहाजिकच त्यांना माढा लोकसभेची सारी माहिती होती. याचा फायदा भाजपला झाला व संजय शिंदे यांना मोठ्या मतांनी पराभव स्वीकारावा लागला आहे