मुंबई: पावसाळी अधिवेशनच्या तोंडावर राज्यातील भाजप नेतृत्वाने मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय घेतला. सूत्रांच्या माहितीनुसार, उद्या (रविवार) सकाळी ११ वाजता मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. त्यासाठी राजभवनात तयारीही सुरु करण्यात आली आहे.
या मोठ्या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात सध्या बऱ्याच चर्चा सुरु झाल्या आहेत. एकीकडे मंत्रिपद मिळण्याच्या आशेने अनेक नेत्यांना आनंदाचं भरतं आलं आहे. पण दुसरीकडे काही मंत्र्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. कारण की, नव्या मंत्रिमंडळ विस्तार अनेक विद्यमान मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भाजपच्या तब्बल पाच मंत्र्याची गच्छंती होण्याची शक्यता आहे.
कोणत्या मंत्र्यांना मिळू शकतो डच्चू?
प्रकाश मेहता,बबनराव लोणीकर ,विष्णू सावरा ,प्रविण पोटे ,विद्या ठाकूर ,राजे अंबरीश आत्राम या मंत्र्यांना नारळ मिळण्याची शक्यता आहे.
एम पी मिल कम्पाउंड एफएसआय प्रकरणी लोकायुक्तांचा रिपोर्टनंतर प्रकाश मेहता यांचं मंत्रिपद धोक्यात आलं आहे. पावसाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होणार असल्याने यावेळी मेहता यांच्या या प्रकरणावरून विरोधक गदारोळ करण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे प्रकाश मेहता यांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे.
याशिवाय पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांना देखील मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. याशिवाय आदिवासी विकास कॅबिनेट मंत्री विष्णू सावरा आणि अंबरीश आत्राम यांनाही मंत्रिमंडळातून वगळलं जाऊ शकतं. या तीनही मंत्र्यांची कामगिरी म्हणावी तशी नसल्याने राज्यातील नेतृत्व त्यांच्यावर नाराज असल्याचं समजतं आहे.
भाजपकडून अमरावतीचे आमदार अनिल बोंडे, औरंगाबादचे पूर्व मतदारसंघाचे भाजपचे आमदार अतुल सावेंचं नाव मंत्रीपदासाठी निश्चित झालं असल्याची माहिती समोर आली आहे.शिवाय काँग्रेस मधून आलेले राधाकृष्ण विखे पाटील, आणि सेनेतून आलेले जयदत्त क्षीरसागर याचा ही समावेश जवळपास निश्चित आहे. शिवसेनेकडून तानाजी सावंत यांनाही संधी मिळणार असल्याचे बोलले जात आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेजी यांची मातोश्री येथे भेट घेतली आणि मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात विस्तृत चर्चा केली.परवाच उद्धव ठाकरे हे मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल मला काही कल्पना नाही म्हणाले होते.
दरम्यान, या मंत्रीमंडळ विस्तारात भाजपकडून 5 तर शिवसेनेकडून 2 मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे.