नवी दिल्ली। शिवरायांची राजधानी रायगडला राजधानीचा दर्जा, आणि बैलगाडी शर्यतीस परवानगी देण्याची मागणी केल्याने सर्वांच्या कौतुकास पात्र ठरलेले राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील आपल्या भाषणात कौतुक केले. यावेळी मोदींनी भारतीय जनता पार्टीच्या खासदार डॉ हीना गावित यांचाही उल्लेख करत गावित यांनी आदिवासी संदर्भात मांडलेल्या मुद्दांचा संदर्भ दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर आभाराचे भाषण केले. यावेळी त्यांनी सर्व खासदारांचे स्वागत करत, नवनिर्वाचित खासदारांचेही विशेष कौतुक केले.

लोकसभा निवडणूकीनंतर सरकारचे लोकसभेतील कामकाज सुरू झाले आहे. अधिवेशनातील चर्चासत्रात जवळपास ६० खासदारांनी सहभाग घेतला. अनुभवी खासदारांनी आपल्या परीने उत्तम भाषणे केली. तर नव्याने आलेल्या खासदारांनीही चर्चासत्रात अतिशय उत्कृष्टपणे चर्चा घडवून आणल्याचे मोदींनी आपल्या भाषणात सांगितले.
यावेळी मोदींनी देशातील १३० कोटी जनतेनं पुन्हा एकदा स्पष्ट बहुमताच्या सरकारची निवड केली आहे. पुन्हा एकदा आमच्यावर विश्वास ठेवला आहे, त्या विश्वासाला सार्थक बनवण्यासाठी सर्वांनी एकत्र काम करायचे असल्याचे आवाहन मोदींनी सर्व खासदारांना केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खासदार डॉ. अमोल कोल्हे, हिना गावित या महाराष्ट्रातील खासदारांचा उल्लेख करत त्यांनी चर्चासत्रात मांडलेले मुद्दे महत्त्वाचे असल्याचे स्पष्ट केले. यावेळी मोदींनी आपल्या भाषणात पुन्हा एकदा आणीबाणीवरुन काँग्रेसला लक्ष्य केलं. आणीबाणीचा डाग कदापी पुसला जाणार नाही, असे म्हणत मोदींनी काँग्रेसला लक्ष्य केलं.