नवी दिल्ली : भाजपचे खासदार ओम बिर्ला लोकसभेच्या अध्यक्षपदी विराजमान होणार आहेत. ओम बिर्ला हे राजस्थानातील कोटा-बूंदी मतदारसंघामधून भाजपचे खासदार आहेत. वीरेंद्र कुमार यांची काल हंगामी लोकसभाध्यक्ष म्हणून निवड झाली होती. त्यानंतर लोकसभाध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार, याबाबत उत्सुकता ताणली गेली होती.
ओम बिर्ला हे सलग दुसऱ्यांदा कोटामधून खासदारपदी निवडून आले आहेत. 2003, 2008 आणि 2013 मध्ये बिर्ला राजस्थान विधानसभेवर निवडून आले होते. ओम बिर्ला यांनी सलग सहा वर्ष अखिल भारतीय जनता युवा मोर्चाचं राष्ट्रीय उपाध्यक्षपद भूषवलं आहे. तर राजस्थान भाजयुमोच्या अध्यक्षपदीही ते सहा वर्ष विराजमान होते.
संसदेच्या अधिवेशनाला काल सुरुवात झाल्यानंतर खासदारांचा शपथविधी पार पडला. आज लोकसभा अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली. लोकसभा अध्यक्षपदासाठी एनडीएचे उमेदवार असलेल्या ओम बिर्ला यांना बिजू जनता दलाने पाठिंबा दिला आहे. त्यामुळे लोकसभेचं उपाध्यक्षपद बिजू जनता दलालाच दिलं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नॅशनल पिपल्स पार्टी, मिझो नॅशनल फ्रंट, लोक जनशक्ती पक्ष, वायएसआर काँग्रेस, जदयू, अण्णाद्रमुक, अपना दल, बिजू जनता दल यांनी ओम बिर्ला यांच्या उमेदवारीला पाठिंबा दर्शवला आहे.